रत्नागिरी: जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मटका आणि जुगार खेळांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने थेट मारुती मंदिर परिसरात धडक कारवाई करत, खुलेआम ‘मुंबई मटका जुगार’ चालवणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक दिनांक ०८/१२/२०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नियमित गस्त घालत होते. याच वेळी, त्यांना मारुती मंदिर परिसरात काही इसम आपले हस्तकांमार्फत लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळ खेळवत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाई करत मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या गॅलरीकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. तिथे एक इसम बसून काहीतरी लिहीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. संशय बळावल्याने पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी ५:५५ वाजता त्या व्यक्तीस जागीच ताब्यात घेऊन त्याच्या लेखनाची खात्री केली. तपासणीअंती, सदर इसम पावती बुकांवर मुंबई मटका जुगाराचे आकडे आणि त्यासमोर पैसे लिहीत असल्याचे स्पष्ट झाले.
चौकशी दरम्यान या आरोपीने आपले नाव मेघशाम चंद्रकांत नाचणकर, वय ५१, रा. मच्छिमार्केट समोर, बाजारपेठ, रत्नागिरी असे सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपी मेघशाम नाचणकर यास जागीच ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम असा मिळून एकूण १,५५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी मेघशाम चंद्रकांत नाचणकर याच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४५३/२०२५, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या या कामगिरीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्यासह स.पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा. बाळू पालकर, पो.हवा. विक्रम पाटील, पो.हवा. अमित कदम आणि पो.हवा. सत्यजीत दरेकर या अंमलदारांनी पार पाडली.








