जैतापूर/राजू सागवेकर: येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अखेर विद्यार्थ्यांसाठी बहुप्रतिक्षित कॅरम क्लबची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई दादर येथील दानशूर व्यक्तिमत्व श्री सुधाकर राजाराम पाटणकर आणि जैतापूरचे कर्तव्यदक्ष सरपंच श्री राजप्रसाद राऊत यांच्या माध्यमातून या कॅरम क्लबला सुरुवातीला एक-एक कॅरम सेटची देणगी मिळाली असून, या महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी प्रत्येकी एक सेट उपलब्ध होणार आहे. यामुळे शाळेतील कॅरम खेळाडूंना सातत्याने सराव करण्याची संधी मिळणार आहे, ज्याची त्यांना दीर्घकाळापासून आवश्यकता होती.
या प्रेरणादायी कॅरम क्लबचे उद्घाटन जैतापूरचे सरपंच श्री राजप्रसाद राऊत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रा. आरोग्य केंद्र जैतापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परांजपे, आरोग्य सहाय्यक श्री कसालकर, पालक संघाचे श्री उमेश होलम, श्री संकेत लासे, श्री जाधव, सौ. सायली होळकर, श्रीमती वैष्णवी मिठबावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नारे मॅडम, कॅरम मार्गदर्शक श्री आदित्य करगुटकर, सर्व शिक्षक वर्ग आणि संस्था विश्वस्त श्री दिवाकर आडविरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूलचे अनेक विद्यार्थी यापूर्वीच जिल्हा आणि राज्य स्तरावर कॅरम खेळात चमकदार कामगिरी करत आहेत. त्यांना अधिक चांगल्या सरावासाठी आणि कौशल्याच्या विकासासाठी कॅरम साहित्याची नितांत गरज होती. श्री. पाटणकर आणि सरपंच श्री. राऊत यांच्या या देणगीमुळे विद्यार्थ्यांच्या सरावाची उत्तम सोय झाली आहे. या उपक्रमामुळे शाळेत एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या कॅरम क्लबमुळे भविष्यात आणखी चांगले कॅरमपटू घडतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.