देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख बागवाडी अंगणवाडीत गेली २३ वर्षे मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या प्रतिभा प्रदीप सावंत यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने बागवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळच्या रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील असलेल्या प्रतिभा सावंत गुरुवारी दुपारी अंगणवाडीतून घरी परतल्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी खेडशी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अंगणवाडी क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना आदराने स्मरण केले जात आहे.