GRAMIN SEARCH BANNER

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १६ वे मरणोत्तर देहदान

Gramin Varta
345 Views

रत्नागिरी : नाणीज (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ समाजसेवक, माजी सरपंच व पोलिस पाटील कै. श्री. नारायण शिवराम सावंत (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान याच दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले. हे महाविद्यालयातील १६ वे मरणोत्तर देहदान ठरले.
कै. नारायण सावंत यांच्या पश्चात पुतणे श्री. प्रफुल्ल सावंत व श्री. महेश सावंत आहेत. आयुष्यभर समाजहिताला प्राधान्य देत त्यांनी नाणीज ग्रामपंचायतीत तब्बल २५ वर्षे सरपंच व २५ वर्षे पोलिस पाटील म्हणून निस्वार्थ सेवा बजावली. याशिवाय २६ वर्षे गावप्रमुख म्हणून कार्य करताना नाणीज पंचक्रोशीत गरजू नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मोडी लिपीचे भाषांतर विनामोबदला करून देण्याचे कार्यही त्यांनी अनेक वर्षे केले.

ग्रामपंचायत प्रशासक म्हणून काम करत असताना नाणीज ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली, जिथे घरकुल योजना, कुटुंब कल्याण योजना तसेच शासकीय नळपाणी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाकडून त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मरणोत्तर देहदानाच्या वेळी नाणीजचे पोलिस पाटील श्री. नितीन कांबळे यांच्यासह संदिप सरफरे, श्रीकांत सावंत, अशोक सावंत, गणेश सावंत, गणपत गुरव, संदेश सावंत, प्रविण सुर्वे, विशाल सरफरे, विकास सरफरे, मकरंद सावंत, सूर्यकांत सावंत व एम. बी. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ही देहदान प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर आणि कर्मचारी मिथिलेश मुरकर, राज पेडणेकर व मिहिर लोंढे यांनी कामकाज पाहिले.

कै. नारायण सावंत यांनी आयुष्यभर समाजासाठी केलेल्या सेवेला मरणोत्तर देहदानाने एक अर्थपूर्ण व प्रेरणादायी शेवट दिला असून, त्यांचे कार्य अनेकांसाठी आदर्श ठरणारे आहे.

Total Visitor Counter

3199402
Share This Article