GRAMIN SEARCH BANNER

देवरुख:गाव विकास समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पुन्हा अपक्ष अर्ज;गाव विकास समितीच्या चिन्हाबाबत सस्पेन्स कायम!

Gramin Varta
153 Views

देवरुख:- देवऱुख नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून गाव विकास समिती (गा.वि.स) कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार, याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. गाव विकास समितीच्या उमेदवार सौ. दीक्षा रवींद्र खंडागळे यांनी रविवारी पुन्हा एकदा अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे युतीच्या चिन्हावर लढण्याबाबत संभ्रम वाढला आहे.

देवरुख नगरपंचायत निवडणुकीसाठी गाव विकास समितीने आम आदमी पार्टी सोबत युती जाहीर केली आहे. या युतीनुसार, गाव विकास समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. दीक्षा खंडागळे या ‘आप’च्या चिन्हावर निवडणूक लढतील, अशी माहिती देण्यात आली होती आणि त्यानुसार समितीच्या उमेदवारांकडून शनिवारी तसा अर्जही दाखल करण्यात आला होता.

पुन्हा अपक्ष अर्ज का?

शनिवारी अर्ज दाखल केल्यानंतर, रविवारी मात्र समितीने वेगळे पाऊल उचलले. गाव विकास समितीचे देवरुख प्रभारी डॉ. मंगेश कांगणे यांच्या उपस्थितीत सौ. दीक्षा रवींद्र खंडागळे यांचा अपक्ष निवडणूक अर्ज पुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे गाव विकास समिती नेमकी ‘आप’च्या चिन्हावर निवडणूक लढणार की अपक्ष म्हणून चिन्हाची मागणी करणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यामुळे चिन्हाबाबत सस्पेन्स वाढला आहे.

लक्ष कोर कमिटीच्या निर्णयाकडे

‘आप’सोबत अधिकृत युती असतानाही ऐनवेळी पुन्हा अपक्ष अर्ज दाखल झाल्याने, गाव विकास समितीने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपली रणनीती बदलली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.हा सस्पेन्स दूर करण्यासाठी आता समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे आणि कोर कमिटी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

यामुळे गाव विकास समितीच्या कोअर कमिटीकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार नेमका कोणत्या चिन्हावर मैदानात उतरेल, हे स्पष्ट होणार आहे.

Total Visitor Counter

3199550
Share This Article