GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायतीत १२ लाखांचा घोटाळा!

Gramin Varta
1k Views

प्रत्यक्षात कामे शून्य, मात्र कागदोपत्री बिले मंजूर करून लाखो रुपये लाटले; सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायतीमध्ये तब्बल १२ लाख रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामस्थ विजय तुकाराम चव्हाण यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात लेखी आणि गंभीर तक्रार दाखल केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासनाच्या विविध योजनांमधील निधीचा गैरवापर केला असून, प्रत्यक्षात जागेवर कोणतीही कामे न करता केवळ कागदोपत्री नोंदी दाखवून लाखो रुपयांची बिले मंजूर करून रक्कम लाटल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदार विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत वित्त आयोगाच्या निधीतून अनेक कामे केवळ कागदावर दाखवण्यात आली आहेत. पाखाडी बांधकाम, दुरुस्ती, संगणक, प्रिंटर खरेदी, स्ट्रीट लाईट बसविणे आणि सौर यंत्रणा बांधणी यासारख्या कामांचा यात समावेश आहे. मात्र, स्थळ पाहणी केली असता ही कामे प्रत्यक्षात झालेली नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. या अनियमिततेत सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, ठेकेदार परवाना नसलेल्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांच्या नावावर पाखाडी बांधकामाची बिले काढण्यात आली आणि त्यांना हजारो रुपयांचे पेमेंटही करण्यात आले आहे.

शासन नियमांना पूर्णपणे बगल देत स्ट्रीट लाईट आणि सौर यंत्रणेच्या कामांसाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली नाही. या नियमांचे उल्लंघन करून सरपंचांनी आपल्या मर्जीतील लोकांना, ज्यांच्याकडे कोणतीही एजन्सी किंवा ठेकेदार नोंदणी नाही, त्यांना तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचे काम दिले, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एवढेच नाही, तर या निधीचा गैरवापर केल्याचे ठोस पुरावेही तक्रारीसोबत सादर करण्यात आले आहेत.

या भ्रष्टाचाराचा आकडा वाढवणारी आणखी अनेक बेकायदेशीर कामे समोर आली आहेत. ग्रामपंचायत वित्त आयोग अंतर्गत शेवट करंडा येथे पाखाडी बांधण्यासाठी ८९ हजार ५०७ रुपये खर्च दाखवला, मात्र जागेवरती कोणतेही काम झालेले नाही. तसेच, स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक कचराकुंड्या वाटप (९६,०००/-), प्लास्टिक साठवण केज (५१,६९८/-), सार्वजनिक संस्थांमध्ये शौचालय बांधणी (१,५०,०००/-), आरोग्य उपकेंद्र साहित्य (२१,५२५/- आणि २७,५२५/-) आणि अंगणवाडी साहित्य (३०,०००/-) ही सर्व कामे ‘संपदा एजन्सी, देवरुख’ यांच्या नावावर दाखवून बिले काढण्यात आली. यात, साहित्य पुरवठा करणाऱ्या एजन्सीच्या नावे चक्क सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम दाखवून पैसे लाटल्याचा आणि प्रत्यक्षात काम झालेले नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
याच गैरव्यवहारात पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायत इमारतीच्या लाईट फिटिंगच्या नावाखाली ठेकेदार शुभम सुनील खातू यांना १ लाख १२ हजार ४५० रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. परंतु, यातील ९२ हजार रुपयांची रक्कम स्वतः ठेकेदाराने परत घेतल्याची कबुली दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फर्निचर खरेदीतही मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. ग्रामपंचायत फर्निचरसाठी ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम खर्च दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात फक्त काही कपाटे, खुर्च्या आणि रॅक एवढ्याच वस्तूंची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत इमारतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला असताना, फर्निचरच्या नावाखाली पुन्हा खर्च दाखवणे म्हणजे थेट भ्रष्टाचार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

या गंभीर प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करताना ग्रामस्थ विजय चव्हाण म्हणाले, “कळंबुशी ग्रामपंचायतीतील सरपंच, ग्रामसेवक आणि काही सदस्यांनी संगनमताने शासनाच्या निधीचा अपहार केला आहे. प्रशासनाने तात्काळ या सर्व कामांची स्थळ पाहणी करून दोषींवर कारवाई करावी. जर ही कारवाई झाली नाही, तर कळंबुशी ग्रामस्थ मोठे आंदोलन उभे करतील.” ग्रामस्थांनी सरपंचांना पदमुक्त करून या संपूर्ण गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक तक्रारीतील ३ लाख ५२ हजार रुपयांच्या अनियमिततेसह, वरील सर्व अतिरिक्त कामांमधून झालेला एकत्रित भ्रष्टाचाराचा अंदाजित आकडा तब्बल १२ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

या मोठ्या गैरव्यवहारावर जिल्हा प्रशासन कोणती पाऊले उचलते, आणि शासनाच्या निधीचा अपहार करणाऱ्या दोषींवर काय कारवाई होते, याकडे आता कळंबुशी ग्रामस्थांचे बारकाईने लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3072889
Share This Article