रत्नागिरी: रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कान नाक घसा विभागाने अत्यंत जटिल मानल्या जाणाऱ्या थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विभागाच्या प्रमुख तज्ज्ञ डॉ. सुनिता बागे यांच्या मार्गदर्शनाखाली चार गरजू महिलांवर ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, यामुळे दुर्गम भागातील सामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या शस्त्रक्रिया प्रामुख्याने गणेशगुळे येथील प्राची गुरव (४२), एमआयडीसी परिसरातील जानकी गुप्ता (५९), कारवांची वाडी येथील चंदादेवी शहा (४२) आणि जाकादेवी येथील दिपश्री गोताड (४३) यांच्यावर करण्यात आल्या. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असताना, शासकीय रुग्णालयात या सर्व महिलांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.
संबंधित महिला गेल्या अनेक महिन्यांपासून गळ्यातील सूज, श्वास घेण्यास होणारा त्रास आणि आवाजातील बदल अशा गंभीर समस्यांनी त्रस्त होत्या. तपासणीअंती त्यांच्या थायरॉईड ग्रंथीमध्ये मोठ्या गाठी असल्याचे समोर आले होते. डॉ. सुनिता बागे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर या शस्त्रक्रिया विना गुंतागुंत यशस्वी केल्या. या मोहिमेत भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख, डॉ. प्रियांका साळुंखे, शस्त्रक्रिया विभाग प्रभारी सुमन कोलापते आणि परिचारिका भावना कुलकर्णी यांनी मोलाची भूमिका बजावली.
या यशस्वी कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. बागे आणि त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक केले. डॉ. बागे यांच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणीच उच्च दर्जाचे उपचार मिळत असून, शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे अधिष्ठातांनी नमूद केले.
याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांच्या सहकार्याचाही विशेष उल्लेख करण्यात आला. डॉ. बागे यांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांचे मार्गदर्शन आणि डॉ. सांगवीकर यांच्या पाठिंब्यामुळेच या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया शक्य झाल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या यशाने रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सामान्य रुग्णांना अशा महागड्या शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध झाल्याने सर्व स्तरांतून प्रशासनाचे आणि डॉक्टरांचे कौतुक होत आहे.






