रत्नागिरी जिल्हा प्रवेश बंदी
लांजा : तालुक्यातील व्हेळ सडेवाडी येथे काका-काकीचा दगडाने खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या प्रतीक चंद्रकांत शिगम (वय २६, रा. व्हेळ सडेवाडी, ता. लांजा) याला मुंबई उच्च न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयीन सुनावणीच्या तारखांशिवाय प्रतीकला जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रतीकच्या जामिनासाठी रत्नागिरी लोकअभिरक्षक कार्यालयाने प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर निर्णय देताना न्यायमूर्ती अश्विनी भोबे यांनी प्रतीकच्या बाजूने निकाल दिला. या खटल्यात उच्च न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण समितीचे अॅड. अजित सावगावे यांनी बाजू मांडली. रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालयाचे प्रमुख अॅड. अजित वायकूळ यांनी हा प्रस्ताव पाठवला होता.
९ मार्च २०१९ रोजी सकाळी प्रतीकने घरात मोठ्या आवाजात गाणी लावल्यामुळे त्याचे काका एकनाथ धकटू शिगम (वय ५५) यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि प्रतीकने दगडाने एकनाथ यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यावेळी एकनाथ यांची पत्नी वनिता शिगम (वय ५०) बचावासाठी पुढे आल्यावर तिलाही प्रतीकने दगडाने मारहाण केली. दगडाचे घाव वर्मी लागल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर प्रतीकने जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांनी सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. लांजा पोलीस ठाण्यात प्रतीकविरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दिवसापासून प्रतीक गेल्या सहा वर्षांपासून तुरुंगात होता.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रतीक शिगमला न्यायालयीन तारखांव्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाचे तंतोतंत पालन करूनच प्रतीकला जामीनाच्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत. या निर्णयामुळे व्हेळ सडेवाडी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, स्थानिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.