लांजा : पुनस येथे ८ जून २०२५ रोजी डांबरी रस्त्याजवळ एका महिन्याचे बिबट्याचे पिल्लू आढळले. माहिती मिळताच वनपाल लांजा, वनरक्षक लांजा व कोर्ले यांनी घटनास्थळी जाऊन पिल्लास ताब्यात घेतले. ग्रामस्थांचा जमाव, तसेच पिल्लू थोडे अशक्त असल्याने मा. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आईसोबत पुनर्भेटीचा प्रयत्न करण्यात आला.
९ व १० जून रोजी, पिल्लाला जंगलात ठेवून कॅमेराद्वारे निगराणी करण्यात आली. कॅमेरात बिबट मादी दोनदा दिसली, मात्र प्रत्यक्ष भेट झाली नाही. यानंतर डॉ. निखिल बनगर यांच्या निगराणीखाली पिल्लू शासकीय विश्रामगृह, लांजा येथे ठेवण्यात आले.
वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, वनपाल सारीक फकीर यांच्या मदतीने पिल्लाची २४ तास निगराणी, फीडिंग व स्वच्छता यांची काटेकोर काळजी घेण्यात आली. पिल्लाच्या आहारासाठी लागणारी पावडर कोल्हापूर-मिरज येथून आणण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी वेळोवेळी देखरेख केली.
थर्मल ड्रोन टीममार्फत बिबट मादीचा शोध घेण्यात आला, परंतु यश मिळाले नाही. आमदार किरण सामंत यांनी देखील विश्रामगृहात भेट देऊन पिल्लाची माहिती घेतली.
२ जुलै २०२५ रोजी, डॉ. निखिल बनगर व सारीक फकीर यांनी पिल्लास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे पुढील संगोपनासाठी सुपूर्त केले. पिल्लू पूर्णपणे स्वस्थ असून, त्याचे तापमान, वजन सर्व सुरळीत आहे.
या सर्व प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. बिडकर, खानसामा श्री. फोंडेकर, श्री. राप, तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले.
मा. गिरीजा देसाई यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, वन्य प्राणी आढळल्यास १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा.
लांजा : पुनस येथे सापडलेल्या बिबट्या पिल्लाचे २५ दिवसांनंतर बोरीवली राष्ट्रीय उद्यानात सुरक्षित सोडले

Leave a Comment