आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, पाठीशी घालणाऱ्यांचाही शोध घेण्याची मागणी
राजन लाड/जैतापूर वार्ताहर : राजापूर तालुक्यातील एका तरुणीचा विनयभंग केलेल्या आरोपीविरुद्ध कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, तसेच या गुन्ह्यात त्याला पाठीशी घालणारे आणि सहकार्य करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी महिलांनी सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे भेट देऊन केली.
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील गावातून सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रामीण महिलांची स्वावलंबी संघटना त्रिवेणी फेडरेशन राजापूर आणि महिला दक्षता समिती, सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या वेळी महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, “आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असेल तर त्यांचाही शोध घेऊन धडा शिकवावा. आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना धडा मिळावा यासाठी आवश्यकता भासल्यास आम्ही मोठ्या संख्येने महिलांना घेऊन त्या लोकांच्या वरिष्ठांना भेटणार असल्याचेही या महिलांनी म्हटले आहे.
या भेटीत महिलांनी पोलिसांचे वेळेवर केलेल्या कारवाईबद्दल अभिनंदन केले. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महिलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष उपक्रम राबवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध बी.एन.एस. कलम 78(2) व 79 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी अणसुरे, दांडे, दळे जैतापूर नाटे, मीठगवाणे, भालावली आडिवरे आदी पश्चिमेकडील अनेक भागातील प्रतिनिधिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यामुळे या प्रकरणात महिलांची एकजूट ठळकपणे जाणवली.
महिलांच्या या ठाम भूमिकेमुळे परिसरात या घटनेबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली असून, राजकीय किंवा इतर कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिस प्रशासन न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.