GRAMIN SEARCH BANNER

गोळपच्या श्री रामदरबार प्रतिष्ठानतर्फे ३० ऑक्टोबरला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

रत्नागिरी – श्री रामदरबार प्रतिष्ठान, गोळप यांच्या वतीने कै. अनंत रघुनाथ काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवव्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पाटणकर कार्यालय, फिनोलेक्स फाटा, गोळप येथे होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वक्त्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे.

या स्पर्धेसाठी ‘खरा तो एकचि धर्म…’, ‘लोकोत्तर पुरुष आणि मी’, ‘सोशलमीडिया… चिंता आणि चिंतन..’, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय..’ आणि ‘मला बोलायचंच नाहीये..’ असे पाच वैविध्यपूर्ण विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर आपले विचार मांडायचे आहेत. स्पर्धेतील भाषणाची वेळ किमान ५ ते कमाल ७ मिनिटे असून, वेळेचे बंधन पाळणे अनिवार्य आहे. वेळ कमी किंवा जास्त झाल्यास स्पर्धक बाद ठरवण्यात येईल.

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास १५०० रुपये, द्वितीय क्रमांकास १२०० रुपये, तर तृतीय क्रमांकास १००० रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक दिले जाईल. जर स्पर्धकांची संख्या जास्त असेल, तर उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी ५०० रुपये आणि प्रशस्तीपत्रकही देण्यात येईल. तसेच, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रशस्तीपत्रक दिले जाईल.
स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत श्री. अविनाश काळे (मो. ९४२२३७२२१२) यांच्याकडे नोंदवावीत. स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण समारंभ स्पर्धा संपल्यानंतर लगेचच होणार आहे. स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत, तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे प्रतिष्ठानकडून कळवण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3484523
Share This Article