GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणच्या तरुणाकडून नागपूरच्या युवतीला ब्लॅकमेलिंग; ₹ १ लाख २० हजार उकळले

Gramin Varta
383 Views

चिपळूण: सोशल मीडियाच्या आभासी जगात होणारी मैत्री किती धोकादायक ठरू शकते, याचे भयावह उदाहरण नागपुरात समोर आले आहे. इन्स्टाग्रामवर मैत्रीचे आमिष दाखवून ओळख वाढवल्यानंतर, व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून नागपुरातील एका २६ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिपळूण (रत्नागिरी) येथील तरुणाने या तरुणीकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळल्याप्रकरणी नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान उर्फ जलालुद्दीन अबुल रफिक नाडकर (रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीची आणि आरोपी फरहानची ओळख मार्च महिन्यात इन्स्टाग्रामवर झाली होती. ओळखीचे रूपांतर लवकरच चॅटिंगमध्ये झाले आणि काही दिवसांतच आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने तिला व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त केले आणि त्याच व्हिडिओ कॉलचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केले.

​या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओचा धाक दाखवत आरोपीने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या या तरुणीने मार्च महिन्यापासून वेगवेगळ्या बँक खात्यांमधून आरोपीला १ लाख २० हजार रुपये दिले. एवढे पैसे घेऊनही आरोपी थांबला नाही आणि त्याने आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली.

​आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आणि या जाचातून मुक्त होण्यासाठी अखेर पीडित तरुणीने हिंमत करून सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले आणि फरहानविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी फरहान उर्फ जलालुद्दीन नाडकर याच्या विरोधात खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असताना, ही घटना तरुणांसाठी एक मोठा इशारा देणारी आहे.

Total Visitor Counter

3366904
Share This Article