GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : प्रा. श्री. पु. भागवत स्मृती परिसंवादाचा कार्यक्रम जाहीर

Gramin Varta
23 Views

रत्नागिरी: येत्या शनिवारी, दि. १५ नोव्हेंबर देवरूखमधील डी-कॅड कॉलेजमध्ये होणार असलेल्या प्रा. श्री. पु. भागवत स्मृती परिसंवादाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

कला- साहित्य-संस्कृती व्यवहार या विषयावर हा एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी साहित्याचे लेखक-अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. नागपूर, कोल्हापूर, धुळे-जळगाव, गोव्यापर्यंतचे ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक निबंध वाचन भाषण करणार आहेत. परिसंवाद देवरूखचे सुपुत्र दिवंगत प्रा. पु. भागवत यांच्या जन्मशताब्दी पूर्ततेनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केले आहे. त्याच्या आयोजनाची जबाबदारी येवला (जि. नाशिक), येथील अनुष्टुभ प्रतिष्ठानने घेतली आहे. स्थानिक आयोजन प्रसिद्ध उद्योगपती अजय पित्रे यांच्या नेतृत्वाखालील देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन (डी-कॅड) कॉलेजने घेतले आहे. त्यामुळे श्री. पु. भागवतांच्या पूर्वीच्या जन्म घरी या उपक्रमाचा सुयोग जुळून आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी व वाङ्मयप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, अशी संयोजकांची अपेक्षा आहे.

आधुनिक मराठी वाङ्मयाच्या जडणघडणीमध्ये आणि त्याचे पालनपोषण करण्यामध्ये प्रा. श्री. पु. भागवत यांचे योगदान फारच मोलाचे आहे. ‘मौज’ आणि ‘सत्यकथा’ या नियतकालिकांचे ते सुजाण संपादक होते. ‘मौज प्रकाशन गृहा’ची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात सुपरिचित असून, त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांना जास्तीत जास्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी दोन साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके व प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर हे यामध्ये सहभागी होणार आहेत.

शनिवारी सकाळी १० वाजता उद्योजक अजय पित्रे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रा. वसंत आबाजी डहाके बीजभाषण करतील.

सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत लोकसंस्कृती हे पहिले सत्र होईल. अतुल पेठे यांच्या अध्यक्षतेखा्लील या सत्रात डॉ. गोविंद काजरेकर (बांदा), डॉ. मुकुंद कुळे (मुंबई) आणि शाहीद खेरटकर (चिपळूण) सहभागी होतील.

दुसरे सत्र भाषासंस्कृती या विषयावर असून ते दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत डॉ. दिलीप धोंडगे (सटाणा-नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यामध्ये वक्ते म्हणून डॉ. दीपक पवार (मुंबई), डॉ. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) सहभागी होतील. दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत डॉ. महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमसंस्कृती या विषयावरील चर्चासत्रात युवराज मोहिते (मुंबई), संपदा जोगळेकर-कुलकर्णी (संगमेश्वर) आणि पराग वडके (चिपळूण) सहभागी होतील. चौथे सत्र दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत वाङ्मयीन संस्कृती या विषयावर होईल. त्याचे अध्यक्षस्थान डॉ. अविनाश सप्रे (सांगली) भूषविणार असून डॉ. प्रमोद मुनघाटे (नागपूर), डॉ. आशुतोष पाटील (धुळे) आणि डॉ. शीतल पावसकर-भोसले (ठाणे) हे वक्ते सहभागी होतील. त्यानंतर देवरूख येथील प्रा. डॉ. सुरेश जोशी परिसंवादाचा समारोप करणार आहेत.

परिसंवादाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनुष्टुभ प्रतिष्ठानचे अध्यक्षा प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर आणि डीकॅडचे प्राचार्य रणजित कृ. मराठे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3199272
Share This Article