देवरुख : निवधे कळकदरा मार्गावरील धनगरवाडी येथे रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बैलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना देवरुख पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेतले. अल्ताफ सरदार मुलाणी (वय २६, रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) आणि पांडुरंग कोंडिबा लांबोरे (वय ३२, रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
रविवारी पहाटेच्या सुमारास देवरुख पोलिस गस्त घालत असताना पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ०९ सीए ५८५७) अशी गाडी निवधे कळकदरा मार्गावरून कोल्हापूरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या मार्गावर धाव घेतली. यावेळी पोलिसांनी एक पांढऱ्या रंगाची बोलेरो थांबवून चालकाकडे चौकशी केली असता. समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाही. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीत चार बैल दाटीवाटीने कोंबलेले आढळले. चालकासह आणखी एकाला बोलेरोसह ताब्यात घेत देवरुख पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या कारवाईत एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे, सचिन कामेरकर, सचिन पवार, अभिजित वेलवणकर व सुतार यांनी केली.
या प्रकरणी आरोपींवर प्राण्यांवर क्रूरतेचा प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१)(घ, ड, च) तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९६७ चे कलम ५(अ), ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
देवरुख – कळकदरा मार्गावर गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो ताब्यात, कोल्हापुरातील दोघांविरुद्ध गुन्हा
