रत्नागिरी(प्रतिनिधी): रत्नागिरीच्या नाचणे रोडवर आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या राज्यस्तरीय पंच शिबिरात राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, उदय सामंत यांनी रत्नागिरीत केवळ कबड्डी खेळासाठी खास स्टेडियम उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. यामुळे जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना, पालकमंत्री सामंत यांनी आपल्या शालेय जीवनातील कबड्डीच्या आठवणींना उजाळा दिला. “शाळेत कबड्डी खेळणारा एक कार्यकर्ता आज पंचांच्या सन्मानासाठी उभा राहतो, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कबड्डी हा केवळ एक खेळ नसून तो आपल्या संस्कृती आणि आत्म्याचा भाग असल्याचं सांगत, त्यांनी रत्नागिरीत फक्त कबड्डीसाठी विशेष स्टेडियम बांधण्याचा संकल्प बोलून दाखवला. या स्टेडियममध्ये कोणताही इतर खेळ खेळला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पंच शिबिराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत सामंत यांनी संघटनेमध्ये हुकूमशाही न येता लोकशाही आणि खेळाचा सन्मान टिकून राहिला पाहिजे, असा संदेश दिला. या शिबिरासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजक, पंच, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचे त्यांनी मनापासून आभार मानले.
यासोबतच, महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला सातत्याने पाठिंबा देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. उदय सामंत यांच्या या घोषणेमुळे रत्नागिरीतील कबड्डी खेळाला एक नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.