दापोली : शहरात काल, दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. काळकाईकोंड, दापोली येथील रहिवासी असलेल्या आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुजल संतोष तडवळकर (वय २१) या तरुणाचा रात्री झोपल्यानंतर सकाळी उठण्यापूर्वीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मायोकार्डियल इन्फेक्शनमुळे हृदय आणि श्वसनक्रिया बंद पडल्याने त्याचे निधन झाले आहे. तरुण वयात अचानक झालेल्या या मृत्यूमुळे तडवळकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, दापोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजल तडवळकर हा ०३/१०/२०२५ रोजी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.०० वाजले तरी तो झोपेतून उठला नाही. त्यामुळे त्याच्या बहीणीचा मुलगा साहील श्रीकांत जाधव हा त्याला उठवण्यासाठी गेला. मात्र, सुजलच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसली नाही. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तात्काळ त्याला दापोली येथील भागवत हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले.
डॉक्टरांनी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कारणाची नोंद करताना, त्याचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. २१ वर्षीय सुजलच्या अकाली जाण्याने कुटुंबाचे आणि मित्रांचे सांत्वन करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जमा झाले होते.
दापोलीत २१ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू; परिसरात शोककळा
