GRAMIN SEARCH BANNER

स्वसंरक्षण ही काळाची गरज; नगरसेविका मेधा कुलकर्णी यांच्याकडून संकेता सावंत यांचे कौतुक

Gramin Varta
117 Views

रत्नागिरी: सध्याच्या काळात स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम असणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी तायक्वांदोसारखे मार्शल आर्ट्स आजच्या मुला-मुलींनी आवर्जून शिकले पाहिजे, असे आवाहन रत्नागिरी नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक सहाच्या नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुलकर्णी यांनी केले आहे. ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षिका आणि राष्ट्रीय पंच संकेता संदेश सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे कौतुक करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
गेल्या वर्षभरापासून अभ्युदय नगर येथील नगरपरिषद बहुउद्देशीय सभागृहात ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र यशस्वीपणे कार्यरत आहे. या केंद्रात परिसरातील अनेक मुले तायक्वांदोचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत असून, नुकत्याच झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत येथील खेळाडूंनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून खेळाडू घडवण्याचे कार्य करणाऱ्या संकेता संदेश सावंत यांनी नुकतेच लातूर आणि गोवा येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पंच म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

पदकविजेती खेळाडू, राष्ट्रीय पंच आणि आता एक यशस्वी प्रशिक्षक असा संकेता सावंत यांचा प्रवास कौतुकास्पद असल्याचे सौ. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्राच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली आणि ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राला भविष्यात लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भविष्यात उत्तम दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी आणि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी संकेता सावंत यांना शुभेच्छाही दिल्या.

Total Visitor Counter

3369446
Share This Article