GRAMIN SEARCH BANNER

मुंबई गोवा महामार्गावर मानसकोंड येथे सांबराला गाडीची धडक; गंभीर जखमी

Gramin Varta
961 Views

एजाज पटेल / संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावरील मानसकोंड येथे वाहनाच्या धडकेत 6 वर्षाचे सांबर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. जखमी सांबराची अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. महामार्गावर पसरलेल्या दाट धुक्यातून रस्ता चाचपडत चालताना वाहनासमोर अचानक सांबर आल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली असून, हा अपघात पहाटे उघडकीस आला.

  घटनास्थळावरील नजारा हृदय पिळवटणारा होता. सहा वर्षाचे निरपराध मादी सांबर तडफडत रक्‍ताच्या पोखरात पडलेले पाहून तिथे जमा झालेल्या ग्रामस्थांचे डोळे नकळत पाणावले. तातडीने ही माहिती मानसकोंड येथील पोलीस पाटील यांनी देवरुख वनविभागाला कळवली. वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडूकर व सहयोग कराडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी अवस्थेतही मृत्यूला झुंज देणाऱ्या सांबराला त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक उचलून देवरुख पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. येथे पशुधन अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघातात सांबराला गंभीर दुखापती झाल्याने अधिक तज्ज्ञ उपचारांची गरज असल्याचे स्पष्ट झाले.

  यासाठी विशेषतः कोल्हापूर येथून पशुवैद्यकीय तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून ते लांजा येथे पोहोचताच पुढील उच्चस्तरीय उपचार सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे जखमी सांबराला लांजाकडे हलविण्यात आले, अशी माहिती वनपालांनी दिली.

       या भागात काही दिवसांपूर्वी कारंजरी येथेही एका सांबराचा वाहनधडकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी दुर्घटना घडल्याने नागरिक आणि पर्यावरण प्रेमींत हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावरील वेग, धुके आणि वन्यजीवांचे वाढते हाल याकडे आता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही केली जात आहे.

वनप्रेमींची वेदनादायी प्रतिक्रिया , “जंगलातील प्राणी रस्ता ओलांडतात म्हणून ते दोषी कसे? वेगवान वाहने, बेफाम ड्रायव्हिंग आणि रात्रीचे धुके… शेवटी जीव जातो तो या मुक्या प्राण्यांचा!”या घटनेने पुन्हा एकदा महामार्गांवर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाची गरज ठळकपणे पुढे आली आहे.

Total Visitor Counter

3199170
Share This Article