GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची सलग विसाव्या वर्षी लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा

रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा काढण्यात आली. सलग विसाव्या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात आले.

भर पावसातही विद्यार्थ्यांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकात शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गीतापठण, गीतगायन आणि लोकमान्यांची आरती करण्यात आली.

लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत कीर्तनकार हभप महेशबुवा सरदेसाई उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, रत्नागिरीचे सुपुत्र लोकमान्य टिळक हे अष्टपैलू व राष्ट्रीय नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चळवळ उभी केली. त्यांचा स्वराज्याचा मंत्र घेऊन आताच्या पिढीने प्रेरणा घेऊन सुराज्यासाठी योगदान द्यावे.

डॉ. साखळकर म्हणाले की, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे म्हणत लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला. स्वदेशी चळवळ, स्वराज्य चळवळ, राष्ट्रीय शिक्षण चळवळ सुरू करून स्वातंत्र्याला पूरक वातावरण तयार केले. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाला पूरक कार्यक्रम राबवले. ते समाजकारणी, राजकारणी, संपादक, लेखक, गणिततज्ज्ञ होते. त्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला.

यावेळी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी गीतेतील अध्याय सादर केले. लोकमान्यांची आरतीही करण्यात आली. या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे श्रीकांत भिडे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे आदींसह प्राध्यापक, एनएसएस, एनसीसी, डीएलएलई व संस्कृत विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2455557
Share This Article