GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: “वाचू आनंदाने” उपक्रम बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात उत्साहात

Gramin Varta
32 Views

चिपळूण(प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषद, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी आयोजित केला जाणारा “वाचू आनंदाने” हा वाचनवेड्या उपक्रमाचा आजचा (रविवार) सत्र बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, मुरूमतळी येथे उत्साहात पार पडला.

चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेला हा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून यशस्वीपणे सुरू असून विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध वाचकांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत वाचनासाठी वेळ देणारा हा उपक्रम चिपळूणमध्ये वाचन संस्कृतीला नवे बळ देत आहे.

आजच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, सौ. भोसले, सौ. चितळे, कैसर देसाई, श्री. चव्हाण, प्रदीप पवार, प्राची जोशी, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, सीए अमित ओक, सुनील खेडेकर आदी मान्यवर व वाचक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“वाचू आनंदाने” या उपक्रमातून नवीन पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होत आहे. डिजिटल युगात पुस्तकांपासून दुरावलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा ग्रंथालयांकडे वळवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

नगर परिषदेच्या पुढाकारामुळे शहरातील दोन महत्त्वाची वाचनालये लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय एकत्र येत एक सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत.

हा उपक्रम पुढील रविवारीदेखील नियमित वेळेत (सकाळी ८ ते १०) होणार आहे. शहरातील वाचनप्रेमींनी आणि पालकांनी आपल्या मुलांसह या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.

वाचन हीच खरी संपत्ती हे ब्रीद घेऊन सुरू असलेल्या या उपक्रमातून चिपळूण शहरात वाचनसंस्कृतीच्या पुनरुज्जीवनास खऱ्या अर्थाने चालना मिळताना दिसत आहे.

Total Visitor Counter

2650649
Share This Article