देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण, खडीओझरे, निनावे गावातील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे एस्.टी. सेवा बंद झाली आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या आठ दिवसांत मार्ग सुरळीत करावा, अन्यथा विद्यार्थ्यांना घेवून आंदोलन करण्याचा इशारा खडीकोळवण गावो उपसरपंच जितेंद्र शेट्ये यांनी दिला आहे.
दुर्गम भागात खडीकोळवण, खडीओझरे, निनावे गावे वसलेली आहेत. मुरादपूर ते कळकदरा मार्गाच्या रुंदीकरणासाठी निधी मंजूर आहे. बामणोली गावच्या पुढे रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र मे महिन्यात अचानक सुरू झालेल्या पावसाने दाणादाण उडवली. मार्गाचे काम अर्धवट असल्याने एस्. टी. वाहतूक धोक्याची बनली आहे. परिणामी देवरुख आगारातून सुटणाऱ्या बस फेऱ्या 18 मे पासून बामणोली गावापर्यंत धावत आहेत.
बामणोली पासून 6 कि.मी. अंतरावर खडीकोळवण, खडीओझरे, निनावे गावांना दोन्ही बाजूने जंगल व मधून रस्ता अशी स्थिती आहे. येथून सुमारे 15 महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी देवरुख येथे येतात. 6 शासकीय कर्मचारी देखील येतात. बस फेरी बंद असल्याने त्यांना पायी, कधी खासगी वाहन तर कधी कळकदरा, साखरपा मार्गे देवरुखला यावे लागत आहे. ठेकेदाराच्या संथ कामामुळे, दिरंगाईमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
ठेकेदाराने मोऱ्यांसाठी मोठमोठे खड्डे खोदले आहेत. खबरदारी म्हणून कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाहीत. मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थांनी चीड व्यक्त केली आहे. लवकरात लवकर मोरीची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे. याबाबत उपसरपच जितेंद्र शेट्ये यांनी वरंवार संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला. येत्या आठ दिवसांत मोऱ्यांची कामे मार्गी न लागल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेट्ये यांनी दिला आहे.