गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील महावितरण कार्यालयात तालुक्यातील विविध गावांतील नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धडक देऊन वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्तीची पद्धत आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांचे होणारे आर्थिक नुकसान, तसेच संभाव्य जीवितहानीच्या धोक्याबाबत यावेळी तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. अनेक ग्राहकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा प्रकार अत्यंत अन्यायकारक असल्याचे सांगत, या मनमानी कारभाराबाबत जाब विचारण्यात आला. अनेकदा तक्रार करूनही वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, स्मार्ट मीटर बसविण्यासह संबंधित धोरणे ही थेट राज्य शासनाकडून राबविली जात असून, त्यात कोणताही धोरणात्मक बदल करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांकडे नाहीत. ग्राहकांच्या तांत्रिक तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुका आणि विविध गावांतील ग्रामस्थांतर्फे महावितरण प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, उपतालुकाध्यक्ष प्रसाद विखारे, स्वप्निल जाधव, राहुल जाधव, प्रथमेश रायकर, विश्वजीत पोद्दार, महेश शिगवण, विवेक जानवळकर यांच्यासह मोठ्या संख्येने वीज ग्राहक आणि नागरिक उपस्थित होते. प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध स्थानिक पातळीवर उफाळून आलेला हा संताप पाहता, वीज ग्राहकांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी महावितरण आता काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
