मकरंद सुर्वे/संगमेश्वर :संगमेश्वर तालुक्यातील मानस कोंड येथे श्रीराम-हनुमान ग्रामस्थ मंडळाचे सचिव व कारभारी गणुजी हिरु फेपडे आणि मुंबई मंडळाचे सचिव भिकाजी हिरु फेपडे यांचा ८० वर्षांचा जीवनप्रवास आणि समाजातील योगदान यांचा गौरव करण्यासाठी मध्यविभाग ग्रामस्थ मंडळ, फेपडे वाडीच्या वतीने समाजरत्न अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात वाडीतील ग्रामस्थ कै. तुकाराम सोमा फेपडे यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करून झाली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून सोहळ्याचा शुभारंभ झाला.ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गणुजी फेपडे आणि भिकाजी फेपडे यांना “समाजरत्न” सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. माजी केंद्रप्रमुख दिगंबर बने गुरुजी आणि चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैदेही सावंत यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान झाला. दोन्ही मान्यवरांनी सत्कार स्वीकारताना ग्रामस्थांचे आभार मानले व पुढील पिढीला सामाजिक बांधिलकी जपण्याचे मार्गदर्शन केले.सत्कार्मूर्तींबरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांचा व जेष्ठ माहेरवासीयांचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यामुळे सोहळ्याला सर्वसमावेशकता व ऊब लाभली.
कार्यक्रमाला आंबेड ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सुहास मयंगडे, वाडी प्रमुख गावकर गणपत दे. फेपडे, पोलीस पाटील सुनील शिगवन, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक आणि माहेरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यअहवाल दिपक फेपडे यांनी सादर केला. त्यांनी दोन्ही मान्यवरांच्या सामाजिक कार्याचा प्रवास, जबाबदाऱ्या आणि मुंबई-मराठवाड्यातील संघटनात्मक योगदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे निवेदन आदर्श शिक्षक विलास कानर गुरुजी यांनी प्रभावीपणे केले.या सोहळ्यातून वाडीतील परंपरा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीची जिवंत झलक दिसून आली. दोन्ही समाजरत्नांचा सन्मान हा व्यक्तींचा नव्हे तर संपूर्ण वाडीच्या कार्यपरंपरेचा गौरव असल्याची भावना उपस्थितांच्या मनात उमटली.
मानस कोंड-फेपडे वाडी येथे समाजरत्न गौरव सोहळा उत्साहात






