चिपळूण : तालुक्यातील आकले–तळवडेवाडी येथे शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने २३ डिसेंबर २०२५ रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत पती, सासू-सासरा तसेच दोन दिरांविरुद्ध शुक्रवारी अलोरे–शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भगवान मोहिते, भगवान शिवा मोहिते, कुसूम भगवान मोहिते, राजू भगवान मोहिते आणि नेताजी भगवान मोहिते (सर्व रा. आकले–तळवडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील नामदेव लक्ष्मण मोहिते (वय ७६, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव मोहिते यांची मुलगी जयश्री विजय मोहिते (वय २७) हिचा विवाह ३ जुलै २०१७ रोजी विजय मोहिते याच्याशी झाला होता. सुरुवातीची चार वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र अपत्य न झाल्याच्या कारणावरून २०२२ पासून पतीसह सासरच्या मंडळींकडून जयश्रीला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
या सततच्या छळाला कंटाळून जयश्रीने २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजता विष प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित पाच जणांविरुद्ध तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अलोरे–शिरगाव पोलीस करीत आहेत
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळुणात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा







