खेड: गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सांगली येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह खेडजाई मंदिराजवळील एका शेतात आढळून आला आहे. बाळू विठ्ठल वाले असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या अंगावरील कपडे आणि इतर खुणांवरून त्याच्या सख्ख्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली आहे. या धक्कादायक घटनेमुळे खेड परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा लक्ष्मीनगर, कुपवाडा रोड (सांगली) येथील रहिवासी असलेला आणि सध्या खेड येथील कुंभारवाडा येथे राहणारा बाळू विठ्ठल वाले (वय ३२ वर्षे) हा खेड येथील एका सिक्युरिटी ऑफिसमध्ये कामाला होता. मात्र, १० मे २०२६ पासून तो अचानक कामावर येणे बंद झाला होता. त्याचा मोबाईल फोनही बंद येत असल्याने त्याचा भाऊ खंडू विठ्ठल वाले याने त्याची शोधशोध सुरू केली. बाळूला पूर्वीही कोठेतरी निघून जाण्याची सवय असल्याने, भावाने सुमारे आठ दिवस त्याची वाट पाहिली. अखेर २० मे २०२६ रोजी तो खेड पोलीस ठाण्यात आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यासाठी आला होता.
खंडू वाले हा पोलीस ठाण्यात असतानाच, संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास खेडजाई मंदिराजवळ असलेल्या शशिकांत राजाराम दांडेकर यांच्या शेतात एका पुरुषाचा मृतदेह उपड्या अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तक्रारदार खंडू हा पोलिसांसह मृतदेहाची खात्री करण्यासाठी घटनास्थळी गेला. शेतात पडलेला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि डोक्याच्या टाळूवरील टकलावरून खंडू याने हा मृतदेह त्याचाच बेपत्ता भाऊ बाळू विठ्ठल वाले याचा असल्याची खात्री केली. हा मृत्यू १० मे ते १९ मे २०२६ या कालावधीत कधीतरी घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात २० मे २०२६ रोजी मध्यरात्री भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३८/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. बाळू वाले याचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.





