संगमेश्वर / एजाज पटेल: तालुक्यातील असुर्डे मनवेवाडी येथे गुरांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत शेतकरी चंद्रकांत भागोजी मनवे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, ग्रामस्थांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे गोठ्यात अडकलेल्या दोन मुक्या जनावरांचे प्राण थोडक्यात वाचले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. जोरदार वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्या आणि संपूर्ण गोठा आगीच्या विळख्यात सापडला. त्या वेळी गोठ्यात दोन जनावरे बांधलेली होती. आगीच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या जनावरांचा आक्रोश ऐकून ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने गोठ्यात प्रवेश करत दोन्ही जनावरांना सुरक्षित बाहेर काढले.
यानंतर ग्रामस्थांनी बोरवेल व उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत गोठ्यातील साहित्य, बांधकाम आणि अन्य वस्तू जळून खाक झाल्याने शेतकरी चंद्रकांत मनवे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच असुर्डे गावचे सरपंच प्रदीप शिंदे, तलाठी अमर फटतरे, ग्रामसेवक कांबळे, कोतवाल संदेश शिंदे तसेच वरिष्ठ लिपिक अजय पड्याळ यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
असुर्डे मनवेवाडीत गुरांच्या गोठ्याला भीषण आग; ग्रामस्थांच्या धाडसामुळे दोन मुक्या जनावरांचे प्राण वाचले






