दापोली: कोकणातील निसर्गसंपन्न दापोली तालुक्यातील टाळसुरे गावाच्या डोंगररांगांमध्ये एका प्राचीन वैभवशाली वारशाचा उलगडा झाला आहे. ग्रामस्थांनी राबविलेल्या विशेष शोध मोहिमेमध्ये दाट झाडीझुडपांनी वेढलेली एक लेणीसदृश्य वास्तू आणि दगडात कोरलेली सुबक देवमूर्ती सापडल्याने संपूर्ण परिसरात सध्या कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. दापोली-खेड मार्गापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरात दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि माजी सरपंच जयवंत जालगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी ही मोहीम हाती घेतली होती.
या मोहिमेदरम्यान एका अरुंद मार्गावाटे ग्रामस्थांनी या वास्तूत प्रवेश केला असता, तिथे गाळाने भरलेली मोठी जागा निदर्शनास आली. याच ठिकाणी मारुती किंवा विष्णूची असावी अशी एक देखणी पाषाणमूर्तीही आढळून आली आहे. विशेष म्हणजे ही वास्तू ज्या नदीकाठी आहे, तीच नदी पुढे प्रसिद्ध पन्हाळेकाजी लेणी परिसराला जाऊन मिळते. यामुळे या नूतन शोध लागलेल्या वास्तूचा आणि पन्हाळेकाजी लेण्यांचा काही ऐतिहासिक संबंध आहे का, यावर आता संशोधकांनी प्रकाश टाकणे गरजेचे बनले आहे.
या भागात केवळ लेणीच नव्हे तर दुर्मिळ कातळ शिल्पेही असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून, आगामी काळात या संपूर्ण परिसराची स्वच्छता करून येथील वारशाचे जतन करण्याचा संकल्प गावाने सोडला आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे टाळसुरे गाव आता राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उमटण्याची चिन्हे असून, यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास जयवंत जालगांवकर यांनी व्यक्त केला आहे. या परिसराचे सखोल उत्खनन आणि पुरातत्वीय अभ्यास झाल्यास कोकणच्या इतिहासातील एक नवे दालन उघडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






