सावर्डे/संदिप घाग : संततीसाठी पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील जागृत श्री शारदा देवी मंदिरात यावर्षी नवरात्रोत्सव सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ आज पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.
महाराष्ट्रातील हे एकमेव श्री शारदा देवीचे मंदिर असून नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यभरातून, देशभरातून तसेच परदेशातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी देवीच्या रुप्यांच्या मूर्ती तसेच गौराई देवीची प्रतिष्ठापना होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजया दशमी या कालावधीत देवीचा शारदोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. या दरम्यान मंदिर सकाळी ८ वाजता भाविकांसाठी खुले होईल व रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन व ओटी भरण्याची व्यवस्था असेल.
दररोज रात्री ९ वाजता महाआरती, तर रात्री १०.३० व ११.३० वाजता परंपरागत जाखडी नृत्य आयोजित केले जाईल. संतती विषयक नवस करणे तसेच फेडण्याचा कार्यक्रम दररोज रात्री ११.३० पासून पहाटेपर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल. या वेळेत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसून देवीचे मुखदर्शन घेता येईल.
नवरात्रोत्सवातील जाखडी नृत्य हे भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे. धोतर, शेला, पेशवाई पगडी व पायात घुंगरू असा पारंपरिक वेश परिधान करून ढोल–वाजत्रीच्या तालावर केले जाणारे हे नृत्य केवळ तुरंबव येथील श्री शारदा देवी मंदिरात अनुभवता येते.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर न्यासाने सर्वतोपरी नियोजन केले असून मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची आरास करण्यात येणार आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एस.टी. महामंडळाने चिपळूण–तुरंबव, सावर्डे–तुरंबव, गुहागर–तुरंबव या मार्गांवर विशेष बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. रेल्वेने येणाऱ्या भाविकांनी सावर्डे स्थानकात उतरावे, गाडीला थांबा नसल्यास चिपळूण येथे उतरून रस्तामार्गे तुरंबव येथे यावे.
उत्सव काळात रात्री लोकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिर प्रांगणात गावकऱ्यांचा सामुदायिक सोने लुटण्याचा सोहळा पार पडेल. दुसऱ्या दिवशी पहाटे देवीसमोर बांधलेले नवधान्य भक्तांना प्रसाद म्हणून वाटल्यानंतर उत्सवाची सांगता होईल.
अधिक माहितीसाठी भाविकांनी श्री शारदा देवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट, तुरंबव यांच्याशी मो. ७७२००७५१९२ / ८२६५०७५१९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे मंदिर विश्वस्त मंडळाने कळविले आहे.
.