रत्नागिरी : झाड तोडण्याचे काम करण्यासाठी गेलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाचा झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मालगुंड येथे घडली. अजित संतोष भोवड असे मृत तरुणाचे नाव असून तो डुगवे गावचा रहिवासी होता. या अपघातानंतर त्याला विविध रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डुगवे येथील अजित भोवड हा १८ डिसेंबर रोजी आपल्या गावातील महेंद्र लोहार, मंदार मलुष्टे, विजय कानडे आणि विजय आग्रे या सहकाऱ्यांसोबत झाडे तोडण्याच्या कामासाठी मालगुंड येथे गेला होता. मालगुंड येथील बळीराम हायस्कूलच्या परिसरात ते झाडे तोडण्याचे काम करत होते.
कामादरम्यान अजित एका झाडावर चढला होता. त्याने तोडण्यासाठी एका फांदीला रस्सी बांधली होती. मात्र, ती फांदी तोडत असताना अचानक तुटली आणि त्याला बांधलेल्या रस्सीमध्ये अजितचे दोन्ही पाय अडकले. यामुळे तो तोल जाऊन थेट जमिनीवर कोसळला. उंचावरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच बेशुद्ध पडला.
सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिथून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील लोकमान्य मल्टिपर्पज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १८ डिसेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद मंगळवारी (दि. २३) दुपारी जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







