GRAMIN SEARCH BANNER

कोकणातील कातळशिल्पांचे गूढ उलगडणार; संशोधनासाठी १४ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद

Gramin Varta
265 Views

मुंबई : कोकणात १७५ गावांत दोन हजारांहून अधिक कातळशिल्पे आहेत. या कातळशिल्पांचे गूढ शाेधून काढण्यासाठी यावर आता संशोधन केले जाणार असून यासाठी राज्य सरकारने १४ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

या संशोधनासाठी मुंबई आणि रत्नागिरी येथील जागतिक वारसा कक्ष निर्माण केला जाणार आहे. या वारसाकक्षाच्या माध्यमातून कोकणातील कातळशिल्पाविषयीचे संशोधन, नवीन स्थळांचा शोध आणि कातळशिल्पांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

कोकणात समुद्रकिनाऱ्यालगत ३०० किलोमीटर अंतरावर विविध ठिकाणी कातळशिल्पे आढळतात. यापैती बारसू येथील कातळशिल्प समूह क्र. २, चवे, देवीहसोळ आणि कशेळी ही कातळशिल्पे राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आली आहे.

युनेस्कोच्या प्रस्तावित वारसा यादीतही कातळशिल्पांचे नामांकन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता या कातळशिल्पांच्या माध्यमातून आद्यऐतिहासिक मानव आणि त्यावेळचा काळ याचा अभ्यास केला जाणार आहे.

यासाठी जागतिक वारसा कक्ष तयार करण्यात येत असून मुंबईतील कक्षाकडून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कातळशिल्पांवरील साहित्यांचा सखोल आढावा घेणे, ऐतिहासिक नकाशे, उपग्रह प्रतिमा व अभिलेखीय साधनांचा अभ्यास करणे तसेच कातळशिल्पांचा माहितीकाेश तयार करण्यात येणार आहे.

ड्रोनद्वारे सर्वेक्षण, नकाशांकन

रत्नागिरीच्या संशोधन कक्षाकडून कातळशिल्पांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, स्थळ पडताळणी होणार आहे. ड्रोनद्वारे कातळशिल्पांचे सर्वेक्षण, जीपीएस आधारित नकाशांकन, छायाचित्रण व ड्रोनद्वारे दस्तऐवजीकरण तसेच भौगोलिक व सांस्कृतिक संसर्भांचा अभ्यास करणार आहे. त्याचप्रमाणे स्थळांची स्थिती व धोके यांचे मूल्यांकन, संवर्धन व संरक्षणासाठी शिफारसी या कक्षाकडून दिल्या जाणार आहेत.

२०१२ पासून कातळशिल्पांचे शोधकार्य, गेल्या तीन वर्षांपासून कोकणातील कातळशिल्पे वारसा केंद्र या द्वारे संशोधनात्मक काम सुरू आहे. राज्यशासनाने वर्ल्ड हेरिटेज डेस्कला मंजुरी दिल्याने संशोधनात्मक खूप मोठ्या प्रमाणात कामाला गती मिळेल. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याकरिता पाठिंबा दिला. गेले काही वर्षे केलेल्या अथक परिश्रमांचे चीज होत असल्याचा आनंद आहे. युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळाची घोषणा झाल्यावर परदेशी पर्यटक कोकणात दाखल होतील.

– सुधीर रिसबूड, कातळशिल्प संशोधक.

Total Visitor Counter

3347708
Share This Article