चिपळूण: चिपळूण येथील पुष्कर हॉलमध्ये आयोजित तायक्वांदो जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत फ्री स्टाईल पुमसे प्रकारात युवा खेळाडू स्वर संदीप घाग याने कांस्यपदक (Bronze Medal) पटकावून चिपळूण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच, चिपळूण तालुका इंटरस्कुल तायक्वांदो स्कूल चॅम्पियनशिप २०२५ मध्येही त्याने कांस्यपदक मिळवत स्पर्धेतील आपले पहिले पदक जिंकले. त्याच्या या यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी शाळेत जाऊन त्याचे अभिनंदन केले.
पत्रकार संदीप घाग यांचा चिरंजीव असलेल्या स्वरने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधून या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्याने सावर्डे येथील अमेय क्लासेसमध्ये प्रशिक्षक भरत करार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२४ पासून कराटेचे प्रशिक्षण सुरू केले. कठोर परिश्रम, नियमित सराव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने तालुका स्तरावरून थेट जिल्हास्तरावर झेप घेतली.
जिल्हास्तरीय स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्यपदक प्राप्त करत त्याने आपल्या क्षमतेची ओळख करून दिली. त्याच्या या यशात अमेय क्लासेसचे चेअरमन राम नादिवडेकर, सौ. नादिवडेकर आणि प्रशिक्षक भरत करार यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.स्वरच्या या कामगिरीमुळे नायशी गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.