रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात संवर्ग एकमधील ७६ शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया मे महिन्यात अपेक्षित होती; मात्र तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दोन महिने विलंब झाला आहे. बदल्यांची चार टप्प्यांतील ही पहिली फेरी पूर्ण झाली असून उर्वरित टप्प्यांबाबत शिक्षकांत उत्सुकता आहे.
संवर्ग एकमध्ये दिव्यांग, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या व ५३ वर्षांवरील शिक्षकांचा समावेश असून या शिक्षकांसाठी आठवडाभरापूर्वी ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या टप्प्यात ९५ इच्छुक शिक्षकांनी अर्ज केले होते, त्यातील ७६ पात्र शिक्षकांची बदली निश्चित करण्यात आली आहे.
दोन दिवसांत संवर्ग दोन, म्हणजेच पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत बदल्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर संवर्ग तीन आणि चारच्या टप्प्यांत बदल्या होणार असून याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संवर्ग तीनमध्ये अवघड क्षेत्रातील तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. यासाठी २०२२ मध्ये निश्चित केलेली ९०० अवघड क्षेत्रातील शाळांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
संवर्ग चारमध्ये एकाच शाळेत पाच वर्षांहून अधिक सेवा केलेले आणि अवघड क्षेत्रात दहा वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांचा समावेश असेल. सुमारे १,१०० शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून किमान एक महिना लागणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जूनमध्येच पूर्ण होणारी ही प्रक्रिया जुलैमध्ये सुरू झाली असून प्रत्यक्ष बदल्यांची अंमलबजावणी दिवाळी सुट्टीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विलंबामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून पुढील टप्प्यांचे वेळेत आणि पारदर्शकपणे आयोजन होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यांतर्गत ७६ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या; पहिला टप्पा पूर्ण, उर्वरित टप्प्यांकडे लक्ष
