लोटे एमआयडीसी प्रदूषणप्रश्नी ग्रामस्थांचा संताप; प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक मोर्चा

Gramin Varta
342 Views

चिपळूण– रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून, प्रदूषण करणाऱ्या सहा कंपन्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ सोनगाव परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत संबंधित कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

गेल्या वीस दिवसांपासून लोटे एमआयडीसीतील काही कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रदूषणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून विहिरी, ओढे आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंपन्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सोनगाव परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करून परिसरातील प्रदूषण कायमस्वरूपी थांबवावे, अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Total Visitors :
4841082
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *