पोलिस अधीक्षकांनी घातले लक्ष; डॉग स्कॉड दाखल
चिपळूण: येथील धामणवणे गावात एका सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षिकेची अज्ञात हल्लेखोरांनी हातपाय बांधून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घरात एकट्याच राहणाऱ्या या ६८ वर्षीय महिलेच्या हत्येमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मयत महिलेचे नाव वर्षा जोशी (वय ६८) असे आहे. त्या जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी नेहमीप्रमाणे घराचा दरवाजा उघडला नसल्याने शेजाऱ्यांनी उत्सुकतेपोटी घरात डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना वर्षा जोशी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. त्यांचे हातपाय घट्ट बांधलेले होते आणि शरीरावर जखमांचे गंभीर व्रण होते. या दृश्याने हादरलेल्या शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत पोलीस पथक आणि डॉग स्कॉडदेखील दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, या हत्येमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास सुरू आहे. हत्येपूर्वी महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या गंभीर घटनेमुळे चिपळूण शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस विविध बाजूंनी तपास करत असून, लवकरच आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.