पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने बैलाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले
रत्नागिरी: रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील दोन नंबर जेटीवर सोमवारी दुपारी समुद्रात पडलेल्या एका बैलाची स्थानिक तरुण आणि पोलिसांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे सुटका झाली. खोल समुद्रात पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला आणि त्याचा जीव वाचवण्यात आला.
सोमवारी दुपारी एक मोकाट बैल अचानक समुद्राच्या खोल पाण्यात पडला. खोल पाण्यातून त्याला बाहेर काढणे जवळपास अशक्य होते. हे दृश्य पाहताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बैलाला वाचवण्यासाठी फकीर मोहम्मद, सुहेल मजगावकर, यासीन मजगावकर, सलीम, जाविद आणि इम्रान या स्थानिक तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली.
त्याच वेळी, या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार भाऊ पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ क्रेनची व्यवस्था केली. स्थानिक तरुण आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे क्रेनच्या सहाय्याने बैलाला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात यश आले. या कामगिरीमुळे स्थानिक तरुण आणि पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.