GRAMIN SEARCH BANNER

जन्मठेपेची शिक्षा भोगत पॅरोलवर सुटलेल्या फरार कैद्याला नवी मुंबईतून अटक ; रत्नागिरी LCB ची कारवाई

गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

रत्नागिरी: खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर (पॅरोल) पळून गेलेल्या एका कैद्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नवी मुंबईतून मोठ्या शिताफीने अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या फरार कैद्याच्या अटकेमुळे रत्नागिरी पोलिसांच्या शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यातून संचित रजा घेऊन फरार झालेले कैदी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय ३३, रा. गोवा, मूळ रा. विजापूर, कर्नाटक) हा २०११ मधील एका खुनाच्या गुन्ह्यात दोषी असून, गोव्यातील मध्यवर्ती कारागृह, कोलवाड येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याला गोवा कारागृह प्रशासनाने ११ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. या कालावधीत त्याने रत्नागिरीत राहणे अपेक्षित होते. पॅरोलची मुदत संपल्यानंतर ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याला कारागृहात हजर राहणे बंधनकारक होते, मात्र तो हजर झाला नाही.

या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २६२ अन्वये गुन्हा (गुन्हा रजि. क्र. ३७४/२०२४) दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून चन्नाप्पा गंगवार पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, हा फरार कैदी नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे LCB च्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली, पो.हवा/९०९ विजय आंबेकर, पो.हवा/१४०७ दिपराज पाटील, पो.हवा/२६२ विवेक रसाळ आणि चा.पो.कॉ/२१५ अतुल कांबळे यांच्या पथकाने आज, २० जून २०२५ रोजी नवी मुंबई येथे धडक कारवाई करत चन्नाप्पा गंगवारला ताब्यात घेतले. पुढील आवश्यक कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

या यशस्वी कारवाईमुळे गुन्हेगारी नियंत्रणात रत्नागिरी पोलिसांचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Total Visitor Counter

2475126
Share This Article