साहिम खान / फुणगुस : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅप द्वारे शॉर्टकट शोधून फुणगुस मार्गे जाताना केमिकलने भरलेला आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात आयशरमधील केमिकलने भरलेले बॅरल जंगलात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आयशर चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली.
सविस्तर वृत्त असे की, कलर साठी लागणारे 47 बॅरल घेऊन आयशर टेम्पो (जेजी 37 बी 2260) चालक गोवा महामार्गावरून मुंबईकडे जात होता. निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. गुगल मॅपने फुणगुस आणि ऊक्षी मार्ग दाखवला. मात्र ऊक्षी मार्गावरील अवघड वळणामुळे त्याने जाकादेवी फुणगुस मार्गे संगमेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला. फुणगुस येथे सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान आला असता एका अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने आयशर उजव्या बाजूला कलंडला. यामध्ये असलेले 47 बॅरल पैकी 30 बॅरल शिल्लक राहिले आहेत. बाकीचे बॅरल उतारावरील जंगलात वाहून गेले आहेत. आयशरचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती पोलिस पाटील यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याला दिली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.