रत्नागिरी: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून सैतवडे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रशालेतील विद्यार्थिनींनी जयगड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या उपक्रमासाठी प्रशालेच्या कीर्ती, प्रज्ञा, विवेक, प्रताप गटाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः आकर्षक राख्या तयार केल्या होत्या. मुख्याध्यापिका श्रीमती सिद्धी लांजेकर यांच्यासह विद्यार्थिनी जयगड पोलीस ठाण्यात पोहोचल्या. तिथे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक (API) कुलदीप पाटील यांच्यासह सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. यावेळी विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणेच पोलीसही आपल्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस तत्परतेने काम करतात, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी सैतवडे गावचे सरपंच साजिद शेकासन आणि शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव समीर रज्जाक सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करताना कुलदीप पाटील यांनी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमादरम्यान प्रशालेतील विद्यार्थिनी मंजिरी राजेंद्र चौघुले आणि मनस्वी मनोहर किंजळे यांनी अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, त्यामुळे कुटुंबांची होणारी हानी आणि दुर्दशा यावर प्रभावी भाषण दिले. त्यांनी समाजाला अधोगतीकडे नेणाऱ्या या व्यसनांना हद्दपार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. न्यू इंग्लिश स्कूलच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.