GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : महामार्गाच्या दुरावस्थेबाबत संतोष केतकरांनी रांगोळीतून ठेकेदार-शासनाला दिली सणसणीत चपराक!

Gramin Varta
26 Views

चिपळूण : संपूर्ण कोकणातील प्रवाशांचे हाल सोसवणारा आणि वर्षानुवर्षे खड्ड्यांनी भरलेला मुंबई-गोवा महामार्ग आता कला माध्यमातून थेट उघड झाला आहे. चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भोगाळे मैदानात प्रसिद्ध रांगोळीकार संतोष केतकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून ठेकेदार व प्रशासनावर थेट प्रहार केला आहे.

या रांगोळीत महामार्गावरील खड्ड्यांतून होणारा प्रवास, प्रवाशांचा दैनंदिन संघर्ष आणि कोकणवासीयांचा संताप जिवंत चित्रासारखा उभा केला आहे. गणपती बाप्पाच्या हातातील फलकांवर “चला गणराया, पहाया रस्ता! खड्डे मोजू चला!” आणि “जास्त खड्डे, जास्त निधी” असे संदेश ठेऊन ठेकेदार व शासनाच्या भ्रष्ट कारभारावर थेट बोट ठेवले आहे.

संतोष केतकर हे फक्त रांगोळीकार नाहीत, तर कलामाध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय प्रश्नांवर सतत भाष्य करणारे लढवय्ये कलाकार आहेत. याआधी बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांची चित्रं किंवा प्रभाकर जोग यांच्या वादनावर आधारित ‘हलती रांगोळी’ साकारून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

यावेळी मात्र त्यांनी लोकांच्या नाडीला स्पर्श करणारा प्रश्न – महामार्गाची दयनीय अवस्था – थेट रांगोळीत उतरवून प्रशासनाला आरसा दाखवला आहे. ही कलाकृती पाहून गणेशोत्सवात उपस्थित नागरिकांबरोबरच सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे.

संतोष केतकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “रांगोळी ही फक्त कला नाही, ती संवादाचं माध्यम आहे. आमच्या रस्त्यांची अवस्था आणि प्रवाशांचा त्रास जगासमोर आणणं हेच माझं ध्येय आहे.”

गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात संतोष केतकरांची ही रांगोळी केवळ कलात्मक सर्जन नाही, तर प्रशासनाला जागवणारा सणसणीत चपराक आहे.

Total Visitor Counter

3375085
Share This Article