GRAMIN SEARCH BANNER

ताम्हाणे हायस्कूलचे शिक्षक दशरथ जाधव यांना नालंदा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

ताम्हाणे/अंकुश पोटले: शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल माध्यमिक विद्यालय ताम्हाणे येथील ज्येष्ठ शिक्षक दशरथ जाधव यांना नालंदा विद्यापीठाच्या वतीने मानाची ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. पुणे येथील पत्रकार भवन येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट सृष्टीचे अध्यक्ष नितीन धवने-पाटील यांच्या हस्ते जाधव सरांना ही पदवी प्रदान करण्यात आली. गेल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले अतुलनीय योगदान आणि त्यांच्या निष्ठेची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे.

दशरथ जाधव सरांनी आपल्या कारकिर्दीत मूर, मिळंद आणि ताम्हाणे या तिन्ही हायस्कूलमध्ये आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. विशेषतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यांच्या या कामाची दखल यापूर्वीही अनेक संस्थांनी घेतली असून, त्यांना आविष्कार फाउंडेशन कोल्हापूरचा ‘राज्यस्तरीय बेस्ट टीचर अवॉर्ड’ आणि टॅलेंट कट्टा संस्थेचा ‘सह्याद्री रत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. आता शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर नालंदा विद्यापीठाने डॉक्टरेटची मोहोर उमटवल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुणे येथील या पुरस्कार वितरण सोहळ्याला कृत्रिम पावसाच्या संशोधिका डॉ. नीता जोशी, माजी सैनिक व ह्युमन राइट्सचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंग वालीया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगले आणि ‘देऊळ बंद’ चित्रपटातील अभिनेत्री आर्या घारे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जाधव सरांना मिळालेल्या या यशामुळे ताम्हाणे परिसरासह संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Total Visitor Counter

3483782
Share This Article