GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये एसटी बस रस्त्यातच बंद पडल्याने दापोली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

खेड: खेड शहराच्या मध्यवर्ती भागात एसटी बस अचानक नादुरुस्त झाल्याने दापोली मार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून भर उन्हात प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. खेड बस स्थानकाजवळील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासमोर दुपारी बस क्रमांक २२९४ रस्त्यातच बंद पडली. या बिघाडामुळे दुपारपासूनच मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या परिसरात तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते, मात्र इतकी गंभीर कोंडी होऊनही एकही पोलीस कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी उपस्थित नसल्याने नागरिकांनी तीव्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.

रस्ता अरुंद असल्याने आणि नादुरुस्त बस मध्यभागीच उभी राहिल्याने दुचाकी स्वारांचे किरकोळ अपघात घडले असून वाहनचालकांमध्ये वादाचे प्रकारही पाहायला मिळाले. एसटी बस वारंवार रस्त्यात बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. अशा नादुरुस्त गाड्या रस्त्यावर उतरवून प्रवाशांच्या जिवाशी खेळू नका, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. भर उन्हात तासनतास ही कोंडी कायम राहिल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करावा, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3484523
Share This Article