रत्नागिरी: रत्नागिरीचे सुपुत्र आणि मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री, पहिल्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी कै. बाळासाहेब खेर यांचे उचित स्मारक उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.
कै. खेर यांनी केलेले विविध क्षेत्रातील अफाट कार्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत ठरणारे आहे. त्यांचे कार्य व्यक्तीच्या जीवनाला दिशा देणारे व समृद्ध करणारे असे आहे. ते रत्नागिरीचे रत्न होते. तरीही रत्नागिरीत त्यांचे स्मारक उभे राहिलेले नाही. हे स्मारक उभे व्हावे, अशी मागणी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ आणि समविचारींच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन रत्नागिरीचे पालक मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले. पालकमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र व गुजरात यांचा समावेश असलेल्या ब्रिटिशकालीन बाँबे प्रांताचे ते १९३७ ते १९३९ सरकार असताना बाळासाहेब खेर शिक्षणमंत्री होते. बाळासाहेबांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे मिठाच्या सत्याग्रहाच्या सविनय कायदेभंगाच्या मोहिमेतील सहभागामुळे त्यांना १३ महिन्यांचा कारावास झाला. १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग असल्याने त्यांना दोन वर्षे सश्रम कारावासही भोगावा लागला. बाळासाहेब खेर यांनी शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षण विषय सक्तीचा केला. भारतातील एकमेव महिला विद्यापीठाला (एसएनडीटी) कायदेशीर शासकीय मान्यता त्यांनी दिली. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, महोद कर्नाटक विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद व पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता.
मुंबईत खार येथे १९२८ मध्ये चमडी वाला की वाडी या ठिकाणी खाटिक जातीतील कातडे कमावणाऱ्या ढोर समाजाची वस्ती होती. बाळासाहेब खेर यांनी या वस्तीची दयनीय अवस्था पाहून त्यांना पायाभूत सुविधा दिल्या. हळूहळू रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक सुविधा, शिक्षण, बाजारपेठ मिळाली. या वाडीला खेर यांच्या आडनावावरून खेरवाडी असे नाव देण्यात आले. १९३९ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली.
कोकणचे गांधी (कै.) अप्पासाहेब पटवर्धन यांच्या सल्ल्यानुसार १९४८ मध्ये त्यांनी रत्नागिरीतील आपल्या मालमत्तेचा आपल्या आईच्या नावे ट्रस्ट करून त्यामार्फत सर्वोदय छात्रालयाची स्थापना रत्नागिरीत केली. आज सर्वोदय छात्रालय चांगल्या रीतीने काम करत असून त्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ट्रस्टचे जिल्हाधिकारी पदसिद्ध विश्वस्त आहेत.
बाळासाहेब खेर यांनी आपल्या आयुष्यात महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य, भारतीय संविधान समितीचे सदस्य, राजभाषा समितीचे सदस्य, युनायटेड किंग्डममधील भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. ते स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री व स्वातंत्र्यानंतरही पाच वर्षे पहिले मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री व गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष होते. सामाजिक, शैक्षणिक कार्यात एक पैशाचाही अपहाराचा ठपका नसलेले आणि स्वतःची जन्मगावची संपूर्ण मालमत्ता आईच्या नावाने काढलेल्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टला दान करणारे बाळासाहेब खेर हे आदर्शवत आहेत. त्यांच्या या कार्याची स्मृती राहण्यासाठी रत्नागिरीत सध्या बांधकाम सुरू असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीला त्यांचे नाव द्यावे व तसेच त्याचा पूर्णाकृती पुतळा त्याच आवारात उभारून कायमस्वरूपी स्मारक उभे करावे, अशी आमची विनंती करण्यात आली आहे.
स्मारक समितीमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी आमदार बाळ माने, श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, ट्रस्टचे अध्यक्ष संदीप ढवळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष सुरेश पावसकर, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अॅड. राजशेखर मलुष्टे, पत्रकार सतीश कामत आणि मकरंद पटवर्धन यांचा समावेश आहे.
रत्नागिरी : पद्मविभूषण बाळासाहेब खेर यांचे स्मारक करण्याची मागणी

Leave a Comment