दापोली: दापोली-मंडणगड रस्त्यावरील पालगड पवारवाडी येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका सिमेंट मिक्सर ट्रकने उभ्या असलेल्या एस.टी. बसला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, बसचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडणगड आगाराचे एस.टी. बस चालक शंकर बबन घोलप (वय ३८, रा. बोरीचामाळ, मंडणगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांची बस (क्र. एमएच-१४/बीटी-१४९२) घेऊन खेडकडे जात होते. पालगड पवारवाडी येथे त्यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्याचवेळी खेडच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रक (क्र. एमएच-२६/बीई-३९७०) च्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले.
जयदेव नबाकुमार दास (रा. सोंडेघर, जाधववाडी, मूळ रा. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) असे या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याने वेगात ट्रक चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एस.टी. बसला चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर, शंकर घोलप यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम २०२३ च्या कलम २८१ आणि मोटर वाहन कायदा १८४ नुसार जयदेव दास याच्याविरोधात गुन्हा (गु.आर.क्र. १४९/२०२५) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.