GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतून मुंबईत एका तासात पोहचणे होणार शक्य, रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात!

Gramin Varta
620 Views

एप्रिल २०२६ मध्ये होणार उद्घाटन

रत्नागिरी : कोकणातील लोकांना आता मुंबईत एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. रत्नागिरी ते मुंबई असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ हवाई प्रवाशी वाहतुकीने एका तासात पूर्ण होणार असून त्यासाठी रत्नागिरीतील हवाई तळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे विमानतळ एप्रिल २०२६ पर्यंत कोकण वासियांच्या सेवेला सज्ज होणार आहे.

राज्य सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नातून रत्नागिरी विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. कोकणातील लोकांना सध्या मुंबई – रत्नागिरी – मुंबई असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रेल्वे किंवा रस्त्याने सुमारे सात ते आठ तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र आता हा प्रवास एका तासावर येणार आहे. रत्नागिरीतील नवीन विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई ते रत्नागिरी असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ एका तासाभरात पूर्ण होणार आहे.

रत्नागिरी विमानतळ प्रकल्प हा क्षेत्रीय संपर्क योजना अंतर्गत उभारला जात आहे. या विमानतळावर प्रवासी टर्मिनल, धावपट्टी, टॅक्सीवे, एप्रन तसेच नेव्हिगेशन व सुरक्षा सुविधा उभारल्या जात आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे प्रकल्पावर ५० ते ६० कोटींचा खर्च येत आहे. हे विमानतळ सध्या पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कोकणातील प्रवाशांसाठी हा पहिला मोठा नागरी हवाई अड्डा असणार आहे. या विमान प्रवासाने प्रवाशांना केवळ वेळ वाचणार नाही, तर प्रवासाचा खर्चही कमी होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी व पुन्हा येण्यासाठी १८०० ते ३००० पर्यंत विमान तिकीट दर ठेवला जाणार आहे, जो सध्या रेल्वे किंवा बस प्रवासाच्या तुलनेत स्वस्त असणार आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि कोकणात येणा-या व जाणा-या पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर व किफायतशीर होणार आहे. समुद्रकिनारे, किल्ले, ऐतिहासिक वास्तू आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना थेट विमानतळावर उतरता येणार असल्याने प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

रत्नागिरीत उभे रहात असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन एप्रिल २०२६ पर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणाऱ्या या विमान प्रवासासाठी तिकीट बुकिंग, सुरक्षा तपासणी, फ्लाइट वेळापत्रक व इतर सुविधा यावर अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या नवीन विमानतळामुळे रत्नागिरीचा आर्थिक व पर्यटन विकास वाढीला लागणार आहे.

Total Visitor Counter

2650649
Share This Article