चिपळूण: गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी मंगळवारी चिपळूण शहरात आपल्या नव्याने सुशोभित केलेल्या संपर्क कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन केले. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी सुवर्णाताई भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मंगळवारी त्यांच्याच हस्ते कार्यालयाचे दालन खुले करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून भास्करशेठ ठाकरे गटातच राहतील की वेगळा निर्णय घेतील, त्यांच्यात नाराजी आहे का, अशा अनेक चर्चा राज्यभरात सुरू होत्या. मात्र, या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनातून त्यांनी या सर्व चर्चांना एक सौम्य पण अत्यंत ठोस उत्तर दिले आहे. कार्यालयाच्या फलकावरील पक्षाचे नाव आणि आतील सजावटीतून त्यांनी आपली निष्ठा स्पष्ट केली.
कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना भास्करशेठ जाधव म्हणाले की, “उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्याकडे आशेने पाहत आहेत. कार्यालयाच्या फलकावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव स्पष्टपणे झळकत आहे. आतील संपूर्ण सजावट बघितल्यास मी पक्षावर नाराज आहे की नाही, हे कोणीही सहज ओळखू शकेल.” त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, तर राजकीय जाणकारांनी हे विधान ठाकरे गटाशी असलेली त्यांची निष्ठा स्पष्ट करणारे म्हणून पाहिले.
यावेळी वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, तालुकाप्रमुख पप्या चव्हाण, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी नगरसेवक समीर जाधव, प्रतापराव शिंदे, फैसल कासकर, उमेश खाताते, ऐश्वर्या घोसाळकर, बी. डी. शिंदे, बाळा अंबुर्ले, सचिन बाईत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जाधव कुटुंबीयांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षणीय होती. या भव्य उद्घाटनामुळे चिपळूणच्या राजकीय वातावरणात चैतन्याचे वार वाहू लागले असून, कार्यकर्त्यांमध्ये नव्याने ऊर्जा संचारली आहे. संपर्क कार्यालय हे केवळ कार्यालय नसून कार्यकर्त्यांशी संवादाचे ठिकाण आणि नेतृत्वाशी असलेल्या नात्याचे प्रतिबिंब असते, हेच भास्करशेठ जाधव यांनी या उद्घाटनातून अधोरेखित केले आहे.