GRAMIN SEARCH BANNER

जरांगेंचे आंदोलन आरक्षणासाठी नव्हे, सरकार उलथवण्यासाठी रचलेला कट- लक्ष्मण हाके

Gramin Varta
7 Views

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी नसून सरकार उलथवण्यासाठी रचलेला कट असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या तर ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ओबीसी समाजाला मूळतः राज्यकर्त्या जमातींपासून संरक्षण मिळावे म्हणून आरक्षण देण्यात आले होते. मात्र, आज ज्या समाजापासून ओबीसींना संरक्षणाची गरज आहे, तेच लोक ओबीसींच्या कळपात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका हाकेंनी केली.

ते म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट केले त्याचे मी स्वागत करतो. पण जर राज्यात 59 लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटली गेली असतील, तर ओबीसींच्या हक्कांवर गदा येणे निश्चित आहे. राज्यातील सुतार, कुंभार, परत, नाभिक, मेंढपाळ, बंजारा समाज यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. ओबीसी समाज रस्त्यावर उतरत नाही, बोलत नाही म्हणून त्यांचे आरक्षण संपवायचे का? जर सरकारला झुंडशाही समजत असेल, तर आम्हालाही संघर्ष यात्रा आणि मोर्चे काढावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे राजकीय डाव असल्याचा दावा करत हाके म्हणाले की, जरांगे यांनीच उघड केले होते की, ते हे सरकार उलथवून टाकणार आहेत. प्रत्यक्षात विरोधी पक्ष सरकार बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेच, पण त्यात अजित पवार गटातील आमदार-खासदारही सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. जरांगे यांच्या आडून राज्यातील सत्ताधारीच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. गरीब मराठा बांधवांच्या शिक्षण-नोकरीसाठी हा लढा नसून सरकार उलथवण्यासाठी रचलेला कट आहे, असा गंभीर आरोप हाकेंनी केला.

Total Visitor Counter

2650325
Share This Article