GRAMIN SEARCH BANNER

निवळी येथे शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या दोघांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

महावितरणवर हलगर्जीपणाचा आरोप

रत्नागिरी : निवळी येथील शिंदे वाडी परिसरात साफसफाईच्या कामादरम्यान प्रवाहित विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन ग्रामस्थांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १७ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली. प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या घटनेत चंद्रकांत यशवंत तांबे (४०) आणि मृदुला वासुदेव वाडकर (६०) या दोघांनी आपला जीव गमावला. दोघेही शिंदे वाडीतील रहिवासी होते. दरम्यान, ही दुर्घटना महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य संजय निवळकर यांनी केली आहे.

माहितीनुसार, वाडकर कुटुंबियांच्या घराशेजारील महावितरणची वीजवाहक तार दोन दिवसांपूर्वी तुटून पडली होती. त्याबाबत ग्रामस्थांनी तातडीने महावितरणकडे तक्रार दिली होती, मात्र ती दुर्लक्षित करण्यात आली. परिणामी, तुटलेली तार जमिनीवर पडूनही प्रवाहित राहिली. गुरुवारी दुपारी चंद्रकांत तांबे आणि मृदुला वाडकर हे परिसरात झाडे-झुडपे कापण्याचे काम करत होते. त्याचवेळी त्यांनी चुकून प्रवाहित तारेस स्पर्श केला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

सायंकाळी पाचच्या सुमारास एक महिला त्या मार्गाने जात असताना दोघांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले. विजेचा धक्का बसल्याची कल्पना येताच तिने आरडाओरडा केल्यावर गावकरी घटनास्थळी धावले. या भीषण दृश्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. जमावाचा संताप लक्षात घेता ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, ग्रामस्थांनी महावितरणच्या दुर्लक्षामुळे घडलेल्या या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

Total Visitor

0232413
Share This Article