GRAMIN SEARCH BANNER

नागपूर-रत्नागिरी महामार्गचे काम भूसंपादन प्रक्रियेमुळे रेंगाळले, कामाला मिळाली मुदतवाढ

Gramin Search
5 Views

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरीमहामार्गाच्या जिल्ह्यातील कामाला सध्या पडत असलेला पाऊस आणि जमिनी संपादन न होणे अशा अडथळ्यामुळे कामाची गती मंदावली आहे. महामार्गाचे काम सरासरी ५५ टक्के झाले आहे.

काम वेळेत पूर्ण होत नसल्याने या रस्त्यावरून विदर्भातून कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. मूळ रस्ता खोदला आहे. नवीन रस्ताही पूर्ण झालेला नाही. परिणामी रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ या रस्त्याचे काम सन २०२३ पासून सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. पण कामाची गती संथ असल्याने ठेकेदार कंपनीस मुदतवाढ दिली आहे. सिमेंट क्रॉंक्रिटने रस्ता केला जात आहे. मात्र, पहिल्यापासून जिल्ह्यात रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया रेंगाळत राहिली आहे. नुकसानभरपाई देताना कमी अधिक प्रमाण झाल्याने अंकली, चोकाक, शिये येथे जमीन संपादनास बाधीत शेतकऱ्यांकडून विरोध होत आहेत.

चोकाक ते अंकलीपर्यंतच्या रस्त्याचे काम केवळ ५० टक्केच झाले आहे. कोकणातील मिऱ्या बंदर ते आंबापर्यंतचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आंबा ते पैजारवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काम ५५ टक्के झाले आहे. सरासरी जिल्ह्यात ५५ टक्केच काम झाले आहे. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत डोंगर फोडून उड्डाणपूल बांधले जात आहेत. भौगोलिक परिस्थितीमुळे कामाला गती देताना अनेक अडचणी येत आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

१५ जुलैपर्यंत मुदत

आंब्यापर्यंतचा पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील पैजारवाडीपर्यंतच्या भूसंपादनाची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या. भू संपादनाची प्रकरणेही निकालात काढावीत, असेही त्यांनी निर्देश दिले. बैठकीस भू – संपादन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

दृष्टीक्षेपातील महामार्ग
– नागपूर – रत्नागिरी अंतर : ९४५ किलोमीटर
– रूंदी : ४५ मीटर

जिल्ह्यातील बाधीत गावे : ४९
मंजूर निधी : ५६९८.६४ कोटी
जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या : १२ हजार ६०८

Total Visitor Counter

2653496
Share This Article