GRAMIN SEARCH BANNER

कलिंगडाच्या पिकातून लाखोंचा नफा, संगमेश्वरातील तरुण शेतकरी शुभम दोरकडे यांची प्रेरणादायी वाटचाल

Gramin Varta
458 Views

सचिन यादव / संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावातील तरुण शेतकरी शुभम दोरकडे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीशिक्षणाच्या जोरावर पारंपारिक शेतीपासून एक पाऊल पुढे जात बिगर हंगामी कलिंगडाचे आंतरपीक घेऊन लाखोंचा नफा कमावला आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असताना शुभम यांची ही यशोगाथा इतरांना प्रेरणा देणारी ठरत आहे.

दापोली कृषी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ‘काहीतरी वेगळं करायचं’ या उद्देशाने शुभम यांनी पारंपारिक पिकांबरोबरच प्रयोगशील शेतीचा मार्ग स्वीकारला. सप्टेंबरमध्ये बागेच्या दोन ओळींमध्ये विशेष बेड तयार करून ‘विजय’ वाणाची कलिंगड लागवड केली. साधारणतः जूनपूर्वी संपणाऱ्या कलिंगड हंगामाच्या बाहेर हा प्रयोग करणं हे त्यांच्या दृष्टीने मोठं आव्हान होतं. परंतु योग्य नियोजन, सिंचन व खत व्यवस्थापनामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला.

लागवडीवेळी ह्युमिक अॅसिड, 19:19:19, बुरशीनाशक-कीटकनाशकांचा वापर, तसेच बेसल डोसमध्ये स्मार्ट मिलसह सेंद्रिय खत, 10:26:26, सूक्ष्म अन्नद्रव्ये, घरचे गांडूळखत, पोटॅशियम शोनाइट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन यांसारखी खते ठिबक सिंचनाच्या मदतीने दिल्याने कलिंगडाची वाढ उत्कृष्ट झाली. काळजीपूर्वक चार-पाच दिवसांच्या अंतराने फवारण्या घेऊन पिकावर नियंत्रण ठेवले.

या ऑफ-सीजन पिकासाठी पुणे आणि वाशी बाजारपेठांमध्ये भेट देऊन शुभम यांनी पूर्वनियोजन केले. कलिंगड व्यापाऱ्यांशी संपर्क साधून दरांचा अभ्यास करण्यात आला. परिणामी, त्यांच्या शेतातूनच प्रतिकिलो २० रुपये दराने थेट विक्री सुरू झाली. लागवडीनंतर 52 दिवसांतच तोडणी सुरू झाली असून सुमारे 10 टन माल अपेक्षित आहे.

एकूण दोन लाख रुपयांचे उत्पन्न होणार असून खर्च वजा करता तब्बल १ लाख ४० हजारांचा निव्वळ नफा शुभम दोरकडे यांच्या हाती पडणार आहे. एक तरुण शेतकरी, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या जोरावर हंगामाबाहेरचे पिक घेऊन यश मिळवू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Total Visitor Counter

3214773
Share This Article