कसबा, संगमेश्वर येथील सायबर तज्ज्ञ आणि ज्योतिषशास्त्रातील पी एच डी धारक डॉ. फाटक यांनी उलगडला जीवनप्रवास; ७५० हून अधिक हॅक झालेले अकाउंट्स केले रिकव्हर
रत्नागिरी: गोळप येथील ‘गोळप कट्टा’ या वैचारिक व्यासपीठाच्या सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारच्या ७१ व्या कार्यक्रमात, कसबा, संगमेश्वर येथील सुप्रसिद्ध सायबर तज्ज्ञ आणि ज्योतिषशास्त्रातील पी एच डी असलेले डॉ. अक्षय फाटक (मो. ९४२०२०३४९९) यांनी आपला अत्यंत प्रेरणादायी प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. गोळपसारख्या ठिकाणी सलग ७१ महिने हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांनी आयोजक अविनाश काळे यांचे सुरुवातीलाच विशेष कौतुक केले. गोळपशी असलेल्या आपल्या नात्याची आठवण करून देत (त्यांची आई कल्पना बापट गोळपच्या आहेत), त्यांनी सांगितले की, रत्नागिरीत जन्मलेल्या डॉ. फाटक यांचे शालेय शिक्षण कसबा आणि संगमेश्वर येथे झाले. त्यांना गणिताची आवड होती, परंतु विज्ञान शाखेत पुढे करिअर करण्याची इच्छा नसल्याने बारावी सायन्स पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यात बहिण तेजश्री फाटक यांच्या सल्ल्यानुसार, इंजिनिअरिंग न करता थेट मायक्रोसॉफ्ट आणि लिनक्स इंजिनियरिंगचे अवघड सर्टिफिकेशन पूर्ण केले. आई खूप पूर्वीपासून ज्योतिष पाहत असल्यामुळे आणि जुळ्या बहिणींच्या एका केसमुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि या कुतूहलातूनच त्यांनी वराहमिहीर ज्योतिष विशारद पदवी मिळवत त्यात पी एच डी पूर्ण केली; त्यांच्या नावामागील ‘डॉ.’ ही पदवी याच संशोधनासाठी आहे. सोबतच, त्यांनी पुणे विद्यापीठातून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसह एक्सटर्नल बी कॉमची पदवीही मिळवली.
पुण्यात स्थायिक होण्याऐवजी, आई-वडिलांना गरज पडल्यास एका तासात घरी पोहोचता यावे या निर्धाराने त्यांनी रत्नागिरीत कॉम्प्युटर व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी आय टी कॉम्प्युटर सोल्युशन्स या नावाने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला रत्नागिरीमध्ये ओळख नसताना, परिचित श्री. अजय कोल्हटकर यांनी त्यांना तीन महिने स्वतःच्या बाईकवरून विविध गावांत फिरवून काम मिळवून दिले. तीन महिन्यांनी पहिली ऑर्डर मिळाली. यानंतर श्री. किशोर भिडे यांनी योजकचे सर्व्हिसिंगचे काम कायमस्वरूपी दिले आणि व्यवसायासाठी ॲडव्हान्स देण्याची प्रथा सुरू केली. व्यवसाय स्थिरावत असतानाच, कोरोनाकाळात घडलेल्या एका घटनेने डॉ. फाटक यांच्या आयुष्याला मोठे वळण दिले. पुण्यातील एका मैत्रिणीने तिचा चेहरा वापरून अश्लील फिल्म व्हायरल केल्यामुळे आत्महत्या केल्याचे त्यांना कळले; नेटवर्क नसल्यामुळे तिच्या १५२ मिस्ड कॉल्सना ते प्रतिसाद देऊ शकले नव्हते. या गंभीर घटनेमुळे अपराधीपणाची भावना मनात घेऊन त्यांनी त्याच क्षणी एक कठोर निर्णय घेतला, तो म्हणजे यापुढे सायबर क्राईममुळे कोणाचाही बळी जाऊ नये यासाठी काम करायचे आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याला आई-वडिलांनी खंबीर पाठिंबा दिला.
याच समर्पित भावनेतून त्यांनी आजवर सायबर जागृतीबद्दल लेख लिहिले आणि २०२२ मध्ये गोगटे कॉलेजमधील प्रा. माधव पालकर यांच्या माध्यमातून त्यांना पहिल्यांदा बोलण्याची संधी मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ९२ हून अधिक कार्यक्रमांतून सायबर साक्षरतेचे धडे दिले आहेत. या कामासाठी ते कोणतेही मानधन घेत नाहीत; कोणी पैसे दिलेच, तर ते केवळ प्रवास खर्च ठेवून उरलेली रक्कम आशादीप आणि आविष्कार या संस्थांना देणगी देतात. डिसेंबर २०२२ मध्ये एका मुलीचे हॅक झालेले फेसबुक अकाउंट साडेसहा तासांत रिकव्हर केल्यानंतर, आता हे काम त्यांना दोन ते पाच मिनिटांत करणे शक्य झाले आहे. आजपर्यंत त्यांनी देशातील तसेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझीलंड यांसारख्या परदेशांतील मिळून ७५० हून अधिक हॅक झालेले सोशल मीडिया अकाउंट विनामूल्य रिकव्हर करून दिले आहेत. गुजरात मधील एका महिलेने पैसे देण्याचा आग्रह केल्याने, तेव्हापासून ते सगळ्यांना आशादीप आणि आविष्कार संस्थांना देणगी देण्यास सांगतात. त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे १,६२००० रुपये देणगी स्वरूपात जमा झाले असावेत. सायबर अडचणी आणि अकाउंट हॅक झाल्यास आपण चोवीस तास फोनवर उपलब्ध असतो आणि राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे काम करणे शक्य झाले, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. फाटक यांनी अतिशय मोलाची उत्तरे दिली. जुळ्या भावंडांच्या परिस्थितीत फरक का पडतो, हे एकूण बावीस कुंडलींपैकी शष्ठमांश कुंडलीतून कळते, असे त्यांनी ज्योतिषशास्त्राच्या आधाराने स्पष्ट केले. मोबाईलमधील माईक्रोफोनची सेटिंग्ज, बँकांची ॲप्स सुरक्षित असणे, ओटीपी कोणालाही न देणे, अनावश्यक फोन आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष करणे यांसारख्या सायबर सुरक्षेच्या अनेक टिप्स त्यांनी दिल्या. तसेच, बँका आणि सरकार ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देत असले तरी नागरिकांना योग्य सायबर साक्षरता देत नाहीत आणि अडचण आल्यास जबाबदारी घेत नाहीत, यावर त्यांनी भर देत साक्षरतेची गरज स्पष्ट केली. अनेक घटना, किस्से आणि अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी श्रोत्यांना सायबर संस्कारांचे मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांमधील श्री. मनोहर पटवर्धन यांच्या हस्ते डॉ. अक्षय फाटक यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पुन्हा भेटण्याचे आवाहन करून कार्यक्रमाची सांगता झाली.